Produktbeschreibung
केळदी चेन्नम्मा ही कर्नाटक राज्याच्या शिमोगा जिल्ह्यातील केळदी या संस्थानाची राणी होती. चेन्नम्मा यांचा जन्म १६७१ साली झाला तर मृत्यू १६९६ साली झाला. केवळ २६ वर्षांच्या आयुष्यात या राणीने अतुलनीय असे शौर्य गाजविले. केळदी हे राज्य आजच्या शिमोगा जिल्ह्यात होते. या राज्याची स्थापना इ.स. १४९९ साली झाली.हे राज्यकर्ते घराणे नायक घराणे या नावाने ओळखले जाई. या घराण्यातील सोमशेखर नायक या राजाशी इ.स.१६६७ मध्ये चेन्नम्माचे लग्न झाले. सोमशेखर नायक हा या घराण्यातील दहावा राजा होता. त्याचे राज्यकारभाराकडे नीट लक्ष नव्हते. या लग्नानंतर दहा वर्षांनी इ.स. १६७७ मध्ये विरोधी सरदारांनी सोमशेखर नायक याचा खून केला; पण त्यांना राज्य ताब्यात घेणे जमले नाही. राणी चेन्नम्मा सत्तेवर आली. सत्तेवर येताच तिने विरोधी सरदारांचा बंदोबस्त केला. कांही स्थानिक मांडलिक राजे वेगळे राज्य स्थापन करण्याच्या बेतात होते; त्यांचाही चेन्नम्माने बंदोबस्त केला. राणीला मूलबाळ नव्हते.तिने आपल्या जवळच्या नात्यातील बसवप्पा नायक याला दत्तक घेतले. केळदी चेन्नम्माचे मोगल बादशाह औरंगजेब याच्याशी झालेले युद्ध ही ऐतिहासिकदृष्ट्या एक महत्त्वाची घटना आहे. औरंगजेब याने छत्रपती संभाजी महाराज यांचा क्रूर पद्धतीने खून केला होता. छ. संभाजी महाराज यांच्यानंतर त्यांचे धाकटे बंधू राजाराम महाराज इ.स.१६८९ मध्ये छत्रपती झाले. महाराज रायगड येथे असताना औरंगजेबाच्या मोठ्या फौजेने रायगडाला वेढा घातला. धोका ओळखून महाराणी येसूबाई यांनी छ. राजाराम महाराज यांना प्रतापगडला पाठवले. तेथून तमिळनाडुतील जिंजी येथे जाताना वाटेत ते केळदी राज्यात थांबले.राणी चेन्नम्माने छ. राजाराम महाराजांचे स्वागत केले.