Produktbeschreibung
ही गोष्ट आहे एका मराठी कुटुंबाची. गोष्ट आहे तीन पिढ्यांची ;ह्याला पार्श्वभूमी आहे गेल्या बासष्ठ वर्षांतील इतिहासाची; संस्कारांची आणि घटनांची. ह्या काळात अनेक सामाजिक; राजकीय आणि आर्थिक स्थित्यंतरे येऊन गेली. एका साधारण मध्यमवर्गीय घरात घडणारी ही गोष्ट. नेहमीच्या धडपडीतही सुखानं नांदणारं हे घर. आजूबाजूच्या स्थित्यंतरांचे; कधी पुसट तर कधी गडद; पडसाद उमटत गेले. जीवनमान बदलत गेलं; आर्थिक परिस्थिती सुधारत गेली; त्याचबरोबर आजूबाजूचा गोंधळ; अस्थिरता आणि अस्वस्थता वाढतच गेली. येणार्या वादळातही; शिक्षण; संस्कार; मूल्यं यांची ओंजळ जपत इतर अनेकांसारखं हे घरही उभं होतं. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि सत्ताकरणाची गुंतागुंतीची समीकरणं अनाकलनीय असली; तरी भयप्रद आहेत. एक अस्वस्थ खळबळ आहे; सारं काही हरवत चालल्याची भिती वाटते. जगभर उद्रेकाचे पडघम वाजायला लागले आहेत. एकीकडे क्रयशक्तीची भरमसाठ वाढ आहे; तर दुसरीकडे मंदीचा भस्मासूर वाकुल्या दाखवतो आहे. वादळात सापडलेल्या गलबताला दिशाहीनतेचं सावट ग्रासून टाकत आहे. १९२४ साली रत्नागिरीजवळच्या छोट्या गावात जन्माला आलेले विश्वनाथ मोरेश्वर हे पहिल्या पिढीतले; त्यांची दोन मुलं; मोठा रघुनाथ बँकेत नोकरीला; तर धाकटा धनंजय सिक्युरिटी सॉफ्टवेअर आणि एनक्रिप्शन क्षेत्रातील तज्ज्ञ. रघुनाथचा एकुलता एक मुलगा सौभद्र आणि त्याची अमेरिकन मैत्रिण ज्युलिया ही तिसरी पिढी. ६२ वर्षांचा कालखंड; अमेरिका; ब्रिटन; दिल्ली; डोंबिवली असा विस्तृत रंगमंच. एका उत्कंठावर्धक जिगसॉचे तुकडे जुळवत चित्र उभं करणारी ही कहाणी. सामान्य माणसांच्या आयुष्यात असामान्य घटना घडल्या की नाट्य जन्माला येतं. हे नाट्य उलगडून दाखवणारी ही गोष्ट.